इंद्रधनुष्य
![]() |
| याला जीवन ऐसे नाव .... |
आज वातावरण पूर्ण ढगाळ होतं . झाकोळलेल्या आकाशाखाली ढगांची लगबग सुरु होती. दूरवर न्हाऊन निघालेल्या स्वच्छ हिरवळीला धुक्याचा साज शोभून दिसत होता . अंगाला झोंबणारा थंड वारा आणि रिमझिम पावसाच्या सरी देहभान हरवत होत्या. ढगांच्या गडगडाटामध्येच सप्तरंगी इंद्रधनुष्य सातही रंग घेऊन उधळू पाहत होतं . एक विद्युलता कडाडली आणि हे सात रंग भावनांचे रूप घेऊन धरतीवर अवतरले.
समाधान , अपेक्षा, मत्सर , मोह , संताप , क्षमा आणि विश्वास ....
व्यक्त झालेल्या या भावनांना शब्दरूप आलं आणि त्यांचा संवाद सुरु झाला.
समाधान :- खूप दिवसांनंतर या अथांग समुद्राला भेटतोय . त्याचे किनारे मानवाने सजवले आणि सुंदर वनराई तयार केली. निसर्ग जपत वैज्ञानिक प्रगती साधली . नात्यांचा सुंदर जिरेटोप परिधान करून माणुसकी साधली . वाह ....सगळं कसं स्वर्गवतं आहे इथे ....प्रसन्न आणि चैतन्यमय .
अपेक्षा :- हो खरंय .. सगळं सुंदर आहे पण निदान हे सगळं अनुभवायला त्याने स्वतःला थोडा वेळ द्यायला हवा होता . प्रगती आणि पैसा यांच्या मागे लागून हाच माणूस आज हे पूर्ण सुख गमावतोय. कमीत कमी वेळ तरी द्यायला हवा त्याने ...
मत्सर :- माणसासारखा कपटी आणि स्वार्थी सजीव या पृथ्वीवर असूच शकत नाही. डोंगर फोडून आणि हि झाडे तोडून ह्याने काँक्रिटच्या इमारती उभ्या केल्या आणि या निसर्गाचा अक्षरशः ऱ्हास केला . काय रे हे ?.... त्यापेक्षा ती मुकी जनावरं परवडली .
मोह :- या मनोहारी सागर किनाऱ्याला सोडून नको जायला . इथे सुगम संगीत आणि नृत्याला वाव मिळाला तर सोने पे सुहागा होईल. हे निसर्ग म्हणजेच जीवन बाकी सगळं रटाळवाणं ...
संताप - किती किती हा नीचपणा ? ... पूर्ण सगळा धूर त्या कारखान्यातून मुक्तपणे बिनधोक हवेत सोडलाय ..... तो समुद्र म्हणजे काय गटार वाटलं का ह्यांना ?सगळं वापरलेलं पाणी त्यातच चाललंय ....अरेरेरे .... माणसा , कुठे फेडशील रे हे पाप ?
क्षमा - अरे पण तो जे काही करतोय ते चांगल्यासाठीच करतोय ना ? पाप नको त्याला ... चुकीच्या काही गोष्टी केल्या असतील त्याने पण जाणूनबुजून नाही ना ?परमेश्वरा त्याला माफ कर ...
विश्वास :- आजपर्यंत स्वतःच्या बुद्धीमत्तेवर मंगळावर पोचलेला आणि नात्याना समृद्ध करून समाज घडवणारा माणूस या पृथ्वीवर एक दिवस नंदनवन फुलवेल हे मात्र नक्की ....
ह्या भावना आणि हे सगळे संवाद माणसापर्यंत पोचले . आजपर्यंत या सगळ्या जाणिवां पसून अनभिज्ञ असणारा माणूस या सगळ्या भावनांचा पाहुणचार करू लागला.
जागा त्याच्याकडे अपुरी होती म्हणून त्याने समाधान , क्षमा आणि विश्वास यांना आत स्वयंपाकघरात जागा दिली आणि अपेक्षा , मत्सर , मोह आणि संताप हे बाहेरच्या मोठ्या हॉल मध्ये राहू लागले.
माणसाला राहण्याचा पर्याय होता. तो कधी बाहेर तर कधी आत राहायला लागला. बाहेर राहणाऱ्या सगळ्यांना डावलून आत जाणे त्याला अवघड जायचं पण आतून बाहेर तो सहजपणे यायचा. एकटेपणात कधी बाहेरच्या हॉल मध्ये राहिला तर तो अस्वस्थ होई आणि आत असेल तर शांत होई......
आणि ,आणि .........
अगदी तेव्हापासून हा पाहुणचार आजतागायत असाच चालू आहे. वरवर आणि बाहेरून ज्या ज्या गोष्टींचा विचार झाला तिथे हे अपेक्षा , संताप , मोह आणि मत्सर त्याला भेटत राहिले.
आतून मनापासून ज्या गोष्टी झाल्या त्यांना समाधान , क्षमा आणि विश्वास भेटले .
तर्कसंगत विचार सोडून तो जेव्हा स्वत:पासून दूर बाहेर जाऊ लागला तेव्हा त्याला अपेक्षा , संताप, मत्सर आणि मोह यांची साथ मिळाली.
जेव्हा जेव्हा या सगळ्यांना टाळून तो आत जाऊ लागला तेव्हा तेव्हा त्याला समाधान , क्षमा आणि विश्वास लाभले. एकटेपणात तो चिडला, मातला आणि स्वार्थी झाला तेव्हा पूर्ण अस्वस्थ झाला आणि जेव्हा स्वतःवर विश्वास ठेऊन पुढे गेला , चुका स्वीकारून माफी मागितली आणि दिली तेव्हा शांत होऊन तृप्त झाला .
आजही मनात मंद काळोखात, रिमझिम आठवणीत आणि विचारांच्या गडगडाटात जेव्हा अंतरंगांचं इंद्रधनुष्य डोकावते तेव्हा या भावना परत परत जन्म घेतात ….
असाच "आयुष्य" नावाचा खेळ नव्याने खेळण्यासाठी ..!👫



सुंदर.....
उत्तर द्याहटवा��
🙏
हटवाMst 👌👌
उत्तर द्याहटवा🙏
हटवाछान
उत्तर द्याहटवा🙏
हटवाहे सात रंग योग्य प्रमाणात समाविष्ट झाले तर आयुष्याचे सुंदर चित्र प्रत्येकाच्या वाट्याला येण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. सुंदर लेखन 👌👍.
उत्तर द्याहटवाThank you 🙏🙏
हटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवा🙏
हटवा🙏
उत्तर द्याहटवाछान मांडणी ... उत्तम कल्पना ....
उत्तर द्याहटवा🙏🙏
हटवाChan
उत्तर द्याहटवा🙏
हटवा